बंडखोरांना दिलासा : ‘त्या’ आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील बंडखोरांच्या अपात्रतेचा निकाल दृष्टीक्षेपात आला असतांनाच या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मार्च २०२१ मध्ये जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षात उभी फूट पडली होती. यात २७ बंडखोरांनी वेगळी वाट पकडून तत्कालीन शिवसेनेच्या मदतीने सत्तांतर घडवून आणले होते. यामुळे भाजपला भक्कम बहुमत असतांनाही जयश्रीताई महाजन या महापौरपदी आरूढ झाल्या होत्या. तर बंडखोरांचे प्रमुख कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद मिळाले होते. यानंतर भाजप पदाधिकार्‍यांनी बंडखोरांच्या विरोधात अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर याला वेग आला. यातून विभागीय आयुक्तांनी १० आठवड्यांच्या आत अपात्रतेवर निर्णय घ्यावा असे निर्देश हायकोर्टाने दिले होते. यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली होती. या खटल्यात आज दिनांक २० रोजी निकाल अपेक्षित होती.

तथापि, या आधीच महापौर जयश्रीताई महाजन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून यामुळे विभागीय आयुक्तांचा निर्णय येण्याआधीच बंडखोरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात, महापालिकेतील सत्ताधार्‍यांना तूर्तास दिलासा मिळाल्याचेही दिसून आले आहे.

Protected Content