दोन क्रमांकांच्या मिनी ट्रकमधून गुरांची तस्करी : आरोपी फरार

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मांगलवाडी-सुनोदा फाट्याजवळ दोन क्रमांक असणार्‍या मिनी ट्रकमधून गुरांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले असून चालकासह तिघे हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

अलीकडेच चिनावल जवळच्या सुकी नदीच्या पात्रात तब्बल २६ गुरे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गुरे तस्करांच्या वाहनात कोंबल्याने त्यांचा मृत्यू झाल्यानेच तस्करांनी त्यांना नदी पात्रात फेकून दिल्याचे यातून निष्पन्न झाले होते. अर्थात, सावद्यासह परिसरातून गुरांची अवैध वाहतूक निर्धास्तपणे सुरू असल्याचेही यातून अधोरेखीत झाले होते. या घटनेमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच रावेर तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

तालुक्यातील मांगलवाडी-सुनोदा फाट्याजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक मिनी ट्रक बंद पडलेल्या अवस्थेत उभा असल्याचे दिसून आले. तांदलवाडी येथील एका युवकांना हा ट्रक संशस्यास्पद वाटला. त्यांनी याबाबत गाडीत असणार्‍या तिघांना विचारणा केली असता त्यांची भंबेरी उडाली. यात ड्रायव्हरसह एकूण तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या आयशर ट्रकवर दोन क्रमांकांची प्लेट होती. यातील एका प्लेटवर एमपी १३ सीए-९९५० तर दुसर्‍या प्लेटवर एमपी ४१ जीए-२५५८ असे नमूद केले होते.

तांदलवाडीच्या युवकांनी या वाहनाची तपासणी केली असता यात गुरांना कोंबलेले आढळून आले. यातील २४ गुरांचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाल्याचे दिसून आले. यातील मृथ गुरांना रस्त्याच्या बाजूला दफन करण्यात आले असून जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या भागातून सर्रास सुरू असलेल्या अवैध गुरे वाहतुकीला आळा घालण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content