जळगाव प्रतिनिधी । डॉ. पी.पी. पाटील हे निवडक कंपूचे कळसूत्री बाहुले होते, त्यांच्या कार्यकाळात समांतर कुलगुरू कार्यालय चालविले जात होते. यात अनेक गैरव्यवहार झाले असून याची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांनी केली आहे. त्यांनी डॉ. पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत.
डॉ. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या विरूध्द आणि त्यांच्या बाजूने अशी जोरदार शाब्दीक लढाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमिवर बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांनी देखील त्यांच्यावर तोफ डागली आहे.
डॉ. राणे म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील काही जणांनी कळसूत्री बाहुले पाहिजे होते. यामुळे त्यांनी पी. पी. पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त ठरला. त्यांच्या कार्यकाळात समांतर कुलगुरू कार्यालय सुरू करण्यात आले असून यातून अनेक गैरव्यवहार घडले. यात विद्यार्थ्यांच्या पैशांचा अपव्यय करण्यात आला. निविदांमधील गोंधळासह अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यात आले. यामुळे डॉ. पाटील यांचा कालखंड हा खान्देशातील विद्यार्थी आणि समाजाचे नुकसान करणारा ठरला.
डॉ. एस.एस. राणे पुढे म्हणाले की, डॉ. पी.पी. पाटील यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. असल्यास इतक्या उच्च पदावर असणार्या व्यक्तीने याला सहन करण्याची तयारी ठेवणे आवश्यक असते. मात्र असे झाले नाही. दरम्यान, गत चार वर्षात अनेक गैरव्यवहार झाले असून याबाबत सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉ. राणे यांनी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास आपण आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला.
खालील व्हिडीओत पहा डॉ. एस. एस. राणे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/484944629177979