बीएचआर अपहार प्रकरणाचे धागेदोरे पाळधीपर्यंत !

पाळधी, ता. धरणगाव अलीम देशमुख । बीएचआर मल्टी-स्टेट सहकारी बँकेतील अपहार प्रकरणी आज सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेने पाळधी येथे छापा मारल्याने या प्रकरणाचे धागेदोरे पाळधीपर्यंत पोहचले असल्याचे दिसून आले आहे.

काल सकाळपासून पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर अपहार प्रकरणी छापेमारी सुरू केली असून यात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज सायंकाळी सातच्या सुमारास यातील एका पथकाने पाळधी खुर्द येथील सुशील सुंदरलाल झंवर यांच्या निवासस्थानी छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. सुशील झंवर हे सुनील झंवर यांच्याकडे आधी कामाला होते. या पार्श्‍वभूमिवर, त्यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सुशील झंवर यांच्याकडे तपासणी करत असलेल्या पथकाने याबाबत माहिती देण्यास नकार दिला असला तरी बीएचआर प्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्यास दुजोरा दिला आहे. बीएचआर प्रकरणाचे धागेदोरे हे पाळधीपर्यंत येऊन पोहचल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे.

Protected Content