ग.स.चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, ग.स. सोसायटीत कर्मचारी भरतीवेळी विजय प्रकाश पाटील या कर्मचार्‍याच्या नियमित वेतन श्रेणीचा बनावट आदेश काढून फसवणूक केल्याप्रकरणी माजी अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे या दोघांविरुध्द तत्कालीन अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ८ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणात संशयित विलास यादवराव नेरकर व संजय दत्तात्रय ठाकरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर शनिवारी न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्यासमोर कामकाज झाले. युक्तीवादाअंती दोघांचे अटकपूर्व जामीन नामंजूर केले. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

Protected Content