जळगाव प्रतिनिधी । नेहमी वादामुळे चर्चेत राहणार्या जळगाव येथील कारागृहातील दोन कैद्यांच्या चिठ्ठया सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. यात कारागृहात चालणार्या गैरकामांचा गौप्यस्फोट करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा कारागृह हे गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडले आहे. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी असलेला चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप (वय ३५, रा. शिवाजीनगर, जळगाव) याचा ११ सप्टेंबर रोजी कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला. चिन्या याला कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह दोन कर्मचार्यांनी बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे.
दरम्यान, यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच जिल्हा कारागृहातील प्रशासकीय अत्याचाराची माहिती देणार्या दोन चिठ्ठ्या सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. यात कारागृहाचे कर्मचारी हे कैद्यांना व विशेष करून नवीन कैद्यांना अमानुष मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बंद्यांच्या मागणीचे अर्ज घेऊन त्याला प्रत मिळाल्याची (ओसी) कॉपी दिली जात नाही. तसेच, जो दवाखाना, घरच्या जेवणाची मागणी करतो, त्यास जेलबदली मिळते किंवा मारहाण करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप यात करण्यात आले आहेत. भुसावळ येथील बाबा काल्या व इतर कैद्यांना मारहाण करून दुसरीकडे पाठविण्यात आले असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.