जळगाव प्रतिनिधी । येथे आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या दिनांक २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आदिवासी संघर्ष समितीतर्फे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित केले आहे. आंदोलनात टोकरे कोळी, महादेव कोळी यांच्यासह ३३ जमातींवरील अन्याय दूर करावा, जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे, असंवैधानिक जात पडताळणी समित्या रद्द कराव्या आदी मागण्यांसाठी हे एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
आदिवासी संघर्ष समितीचे मुख्य संयोजक अॅड. गणेश सोनवणे, जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर, प्रल्हाद सोनवणे, मंगल कांडेलकर, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता कोळी, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत सोनवणे, संजय कांडेलकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.