जळगावच्या विकास कामांसाठी ४२ कोटींचा निधी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध कामांसाठी ४२ कोटींचा निधी खर्चाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून यातील कामांना प्रत्यक्षात लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

सप्टेंबर २०१८मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील मुलभूत विकास कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. यानंतर ४२ कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय झाला होता. त्यात या निधीतून शहरातील रस्ते, गटारी, नाल्यांची संरक्षण भिंत, मोकळ्या जागांचा विकास, जाँगींग ट्रॅक, ओपन जिम या कामांचा समावेश करण्यात आला आहे. या निधीतून होणार्‍या कामांसाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली होती. तसेच कार्यादेश देऊन प्रत्यक्षात कामांना सुरूवात होणार होती. या दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकारने सर्वच कामांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठावी यासाठी खूप पाठपुरावा करण्यात आला होता. याला यश आले असून या कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

दरम्यान, ४२ कोटींच्या निधीतून होणार्‍या विविध कामांसाठी राज्य शासनाने ३४ कोटी १५ लाख रूपयांचा निधी दिला आहे. या कामांना लवकरच कामास सुरुवात होणार आहे. तर उर्वरित ५८ कोटींच्या निधीला मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगीतले.

Protected Content