जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सर्वच्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
राज्यातील सहकार खात्याच्या निवडणुकांवरील बंदी उठल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने, एरंडोल, जळगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, यावल, अमळनेर, रावेर, पाचोरा, पारोळा, जामनेर, भुसावळ, चोपडा या १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत उत्सुकता लागली आहे. या सर्व बाजार समित्यांवर सध्या प्रशासक राज आहे. मात्र आता लवकरच बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात जिल्हा उपनिबंधक आणि गटविकास अधिकार्यांकडून २७ सप्टेंबर पर्यंत सदस्य सूची मागविण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी प्रारून मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. नामनिर्देशन २३ ते २९ डिसेंबरच्या दरम्यान स्वीकारण्यात येणार आहे. माघारीची मुदत १६ जानेवारीपर्यंत असेल. मतदान २९ जानेवारी रोजी तर मतमोजणी ३० जानेवारीला होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आता निवडणुकीची लगबग सुरू होणार आहे.