सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा जळगाव महापालिकेत निषेध

जळगाव प्रतिनिधी । ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्तांसह त्यांचा अंगरक्षक यांच्यावर मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला झाला आहे. याचा निषेधार्थ आज मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी जळगाव महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करावी अश्या मागणीचे निवेदन आयुक्त सतिष कुळकर्णी यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे ह्या माजीवाडा प्रभागात सोमवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता अतिक्रमण विरोधी पथक घेवून कारवाई करत असतांना हातगाडी फेरीवाले अमरजित यादव याने त्यांच्यावर आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून दोघांना जखमी केले. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे कापले गेले. दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून अश्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. जळगाव महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत संशयित हल्लेखोराला अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी आज मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी यांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनावर अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, मुख्य लेखा परिक्षक संतोष वाहूळे, उपायुक्त प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, मुख्य लेख अधिकारी कपील पवार, प्रभारी अधिकारी कपील पवार, उदय पाटील, विलास सोनवणे, बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र पाटील, सुनिल गोराणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Protected Content