जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी काल रात्री अट करण्यात आलेले व्यवस्थापकीय संचालक अर्थात एमडी मनोज लिमये यांच्या विरोधात खोटा दाखला दिल्याची पुन्हा एक नवीन तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर नव्याने गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी काल रात्री संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या सोबत हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरीशंकर अग्रवाल यांना देखील गजाआड करण्यात आले आहे. जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या होत्या. यातील जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, यानंतर शहर पोलीस स्थानकात चिनावल येथील ठकसेन भास्कर पाटील यांनी नवीन तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, ते स्वत: वसंत सहकारी दुध उत्पादक सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. संस्थेतर्फे करण्यात आलेल्या दुधाच्या पुरवठ्याचा दाखला त्यांना ७ नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आला आहे. यात २०१९-२० या वर्षासाठी ८९७५१ लीटर, २१-२२- ४२६३८ लीटर याप्रमाणे असल्याची माहिती मला देण्यात आली.
यानंतर मी जिल्हा दुध संघासाठी नामनिर्देशन पत्र भरले असता मला कमी दुध पुरवठा असल्याचे कारण दाखवून माझा अर्ज बाद करण्यात आला. यानंतर मी स्वत: संस्थेमध्ये तपासणी केली असता सन २०१९-२० या वर्षात १६१५२९ लीटर; सन २०२०-२१ वर्षात ८६९८४ लीटर, तर २०२१-२२ या वर्षात ८१०६० लीटर इतक्या दुधाचा पुरवठा करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर जिल्हा दुध संघात याबाबत ओरड केल्यानंतर मला योग्य दाखला देण्यात आला. अर्थात जगदीश बढे यांना बिनविरोध निवड करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी आपल्याला खोटा दाखला देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप ठकसेन पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणी मनोज लिमये यांच्या विरोधात भादंवि कलम ४६४, ४६८, ४७१-ब आणि कलम-४२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठकसेन पाटील यांनी केली आहे. या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. लागोपाठ दुसरा गुन्हा दाखल झाल्यास मनोज लिमये यांच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.