दुध संघ अपहार : एम. डी. अटकेत, आता पुढील नंबर कुणाचा ?

जळगाव-जितेंद्र कोतवाल/लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | जिल्हा दुध संघाची निवडणूक रंगात येण्याआधीच संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आल्याने राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर या गुन्ह्याच्या फिर्यादीत तत्कालीन अध्यक्षा, काही संचालक व कर्मचार्‍यांच्या नावाचा समावेश असल्याने आता पुढील क्रमांक कुणाचा ? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी आज रात्री संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तपासणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल हे आता स्पष्ट झाले आहे. लिमये यांच्या सोबत हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरीशंकर अग्रवाल यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, थेट संस्थेच्या कार्यकारी संचालकांनाच अटक केल्यानंतर या प्रकरणात अन्य अटकसत्र होण्याची शक्यता देखील बळावली आहे. यासाठी हा गुन्हा नेमका कशासाठी दाखल झालाय हे जाणून घ्यावे लागेल.

जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या होत्या. यातील जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा दुध संघातून सुमारे १४ टन बटर (लोणी) व ८ ते ९ टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर ) सुमारे २ ते २.५ कोटी रुपये मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावुन टाकण्यात आलेली आहे. सदरची विल्हेवाट ही दुध संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक काही मोजके कर्मचारी यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने लावलेली आहे. सदरचा अर्ज हा सीआरपीसी १५४ अन्वये फिर्याद नोंदवावी याबाबत अर्जात नमुद केलेले होते. या संदर्भात संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये (वय-५९ वर्ष, रा. दुध संघ कँपस जळगाव) यांनी या प्रकरणी अपहार झाला नसून चोरी झाली असल्याचा दावा केला होता. या अनुषंगाने त्यांनी अनंत अशोक अंबीकर, महेंद्रा नारायण केदार या कर्मचार्‍यांना निलंबीत केले होते. यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. यानंतर आज या गुन्ह्यातील प्रमुख संशयित असणार्‍या मनोज लिमये यांना गजाआड करण्यात आले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीत संस्थेचे कार्यकारी संचालक, अध्यक्षा तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचार्‍यांनी अपहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील ( वय ६७); किशोर काशिनाथ पाटील ( वय ५७) आणि अनिल हरीशंकर अग्रवाल ( वय ५९) यांना अटक करण्यात आली आहे. तर, आता लवकरच याच प्रकरणी मोठी कार्यवाही होण्याची शक्यता देखील असून यात अजून काही मान्यवरांना अटक होऊ शकते. यातील पुढील टार्गेट नेमके कोण असणार ? याबाबत आता जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content