ब्रेकींग : दुध संघाच्या कार्यकारी संचालकांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

जिल्हा दुध संघात मध्यंतरी राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. यात मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य दहा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर विद्यमान संचालक मंडळाने या निर्णयाला न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. दरम्यानाच्या कालखंडात या प्रशासक मंडळाने कागदपत्रांची झाडाझडती घेऊन दुध संघात अपहार झाल्याचे शोधून काढले होते. यात दुध आणि लोणी यांच्या विक्रीत अपहार झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. तर संचालक मंडळाने हा अपहार नसून चोरी असल्याचा युक्तीवाद करून दुसरी तक्रार नोंदविली होती. यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस स्थानकात ठाण मांडून आंदोलन केले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्मचार्‍यांवर जबाब बदलण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर आज दुध संघासाठी अर्ज छाननी करण्यात आल्यानंतर रात्री दुध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन अध्यक्षा वा अन्य कुणा संचालकांवर देखील याच प्रकारची कार्यवाही होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content