जळगाव मुख्य बसस्थानकाची दयनीय अवस्था;  कचऱ्याने भरला परिसर


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि व्यापारी केंद्र असले तरी येथील मुख्य बसस्थानकाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. दिवसभर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी यांची मोठी गर्दी असतानाही या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड गैरसोय होत आहे.

दिवसभर प्रवासासाठी थांबणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी बैठकव्यवस्था उपलब्ध नाही. काही प्रवाशांना तासन्तास उभे राहावे लागते, तर अनेक वेळा गाड्यांचा उशीर होत असल्याने असुविधा वाढते. बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. तसेच जुने बांधकामाचा मलबा पडून असल्यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील भागाचे नुकतेच लाखो रुपयांच्या खर्चाने कॉंक्रिटीकरण करण्यात आले असले तरी, बसस्थानकाच्या दुसऱ्या बाजूस—जिथून बसेस बाहेर पडतात—तिथे मात्र अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. या ठिकाणी पाय टाकण्यासही जागा नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बस पकडताना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागते.

प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “राज्यातील इतर जिल्ह्यांमधील बसस्थानके स्वच्छ, नियोजनबद्ध आणि सोयीस्कर आहेत; मात्र जळगावसारख्या शहरातील मुख्य बसस्थानकाचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे.” प्रचंड दुर्गंधीने वातावरण अस्वच्छ झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळ आणि स्थानिक प्रशासन या दोघांच्याही दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक वेळा स्थानिकांनी लेखी तक्रारी केल्या असल्या तरी परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, ते नाशिक येथे बैठकीसाठी गेल्याने त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.