जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची जळगाव जिल्हा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सोहळ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणारे, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारे, ठिबक सिंचनाचा वापर करणारे, फळबाग शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन करणारे अशा विविध प्रकारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, महाराष्ट्र राज्य सचिव अमोल भिसे आणि भागवत कांदे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले.
या बैठकीत जळगाव शहर उपाध्यक्षपदी सचिन पवार आणि मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्षपदी किशोर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते झाली. बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) कल्पेश पवार, जिल्हा सचिव (रावेर लोकसभा) अमोल पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र माळी, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष विनोद पाटील, शहर सचिव हर्षल वाणी, संदीप लोहार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.