जिल्हा बँकेत ‘नारी शक्ती’ : सावित्रीच्या चार लेकी सांभाळणार धुरा !

जळगाव, राहूल शिरसाळे | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काही वैशिष्ट्ये अधोरेखीत झाली आहेत. यात या वेळेस चार महिला उमेदवारांनी बाजी मारल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा हा एक्सक्लुझीव्ह वृत्तांत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २१ पैकी २० जागा जिंकून महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकावला आहे. या विजयाला खूप मोठा आयाम आहे. याचा जिल्ह्याच्या राजकारणातील आगामी वाटचालीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निकालात काही बाबी या लक्षणीय अशाच मानल्या जात आहेत. यातील एक बाब म्हणजे यंदा पहिल्यांदाच चार महिला संचालिका बँकेवर निवडून गेल्या आहेत.

गेल्या संचालक मंडळात रोहिणीताई खडसे-खेवलकर आणि अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांनी महिला राखीव जागांवरून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. यातील रोहिणी खडसे यांनी तर सहा वर्षे बँकेची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळली. यंदाच्या निवडणुकीत तिलोत्तमा पाटील यांच्या ऐवजी जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या अध्यक्षा शैलजादेवी निकम यांना संधी मिळाली. रोहिणी खडसे आणि त्या दोन्ही महिला राखीव जागेवरून निवडून आल्या. तर जळगावच्या महापौर जयश्री महाजन या आधीच जळगाव विकासो मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेल्या होत्या. तर रावेर विकासो मतदारसंघातून जनाबाई गोंडू महाजन यांनी अतिशय नाट्यमय व चित्तथरारक अशा लढतीमध्ये अवघ्या एक मताने विजय संपादन केला. यामुळे या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पहिल्यांदाच चार महिला उमेदवार निवडून गेल्या आहेत.

जिल्हा बँकेतील विजयामुळे रोहिणीताई खडसे यांना विधानसभेतील पराभवानंतर पहिल्यांदा मोठे यश संपादन करता आले आहे. तर महापौरपद मिळाल्यानंतर काही महिन्यातच जिल्हा बँकेचे संचालकपद मिळाल्याने जयश्री सुनील महाजन यांचे राजकीय वजन वाढले आहे. शैलजाताई दिलीपराव निकम यांना आधीच सहकाराचा अनुभव असल्याचा फायदा त्यांना जिल्हा बँकेत होणार आहे. तर रावेरातून जायंट किलर ठरलेल्या जनाबाई गोंडू महाजन या आपले पती गोंडू महाजन यांच्या राजकीय वाटचालीस बुस्टर डोस देणार असल्याचे आजच संकेत मिळाले आहेत.

महिला ही केवळ रबर स्टँप नसून ती ठाम निर्णय घेत एखाद्या संस्थेला शिखरावर नेऊ शकते हे मावळत्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दाखवून दिले आहे. आता त्यांच्या जोडीला अजून तीन महिला संचालिका असल्याने यंदाच्या संचालक मंडळात नारी शक्ती ही आधीपेक्षा तुलनेत अधिक प्रमाणात जाणवणार आहे. सावित्रीच्या या चारही लेकींनी महिला सभासद आणि त्यातही शेतकरी महिलांसाठी भरीव कामगिरी करावी हीच अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content