जिल्ह्यास पहिल्याच टप्प्यात मिळणार दोन मंत्रीपद !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | राज्यातील शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार हा येत्या काही दिवसांमध्ये होणार असून यात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्यातील दोन मातब्बरांना संधी मिळणार असल्याचे आता निश्‍चीत मानले जात आहे. तर दुसर्‍या विस्तारात अजून एखादे राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍यानंतर १२ अथवा १३ जुलै रोजी राज्य मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात पहिल्या टप्प्यात भाजपचे आठ तर शिंदे गटाचे ५ असे एकूण १३ सदस्य मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर उर्वरित मंत्रीपदे ही दुसर्‍या टप्यात भरली जाणार आहेत.

दरम्यान, राज्यातील सद्यस्थितीचा विचार करता माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्‍वासू सहकारी मानले जातात. विश्‍वासदर्शक प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय फक्त गुलाबभाऊंना बोलण्याची संधी मिळाल्याची बाब लक्षात घेता त्यांना पहिल्याच टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्‍चीत झाले आहे. त्यांना खातेदेखील चांगले मिळू शकते.

तर दुसरीकडे माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून भाजपच्या ज्येष्ठांमध्ये त्यांची गणना होते. जर दिल्लीतील श्रेष्ठींनी काही धक्कातंत्राचा वापर केला नाही तर फडणवीस यांच्या सर्व निकटवर्तीयांना मंत्रीपद मिळू शकते. यात आमदार गिरीश महाजन यांचा पहिल्याच टप्प्यातील शपथविधीत समावेश होऊ शकतो. त्यांना गेल्यावेळेस प्रमाणेच या वेळेसही चांगले खाते मिळण्याची शक्यता आहे. तर, दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यास एखादे राज्यमंत्रीपद मिळू शकते.

Protected Content