अखेर देवकर आप्पांचे पुनर्वसन; राष्ट्रवादी नेतृत्वाने साधले संतुलन

जळगाव, मोरेश्‍वर सोनार | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेनुसार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना अध्यक्षपदाची संधी देऊन राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्यांचे प्रदीर्घ काळानंतर पुनर्वसन केले आहे. या माध्यमातून श्रेष्ठींनी जळगाव जिल्ह्यात संतुलन देखील साधण्याचा प्रयत्न केला असून याचे आगामी काळातील निवडणुकांमध्ये सकारात्मक परिणाम पहायला मिळण्याची शक्यता आहे. वाचा लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे एक्सक्लुझीव्ह राजकीय विश्‍लेषण.

तत्कालीन मंत्री गुलाबराव देवकर यांचा घरकूल घोटाळ्याने घात केला. यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले. त्यांनी कारागृहातून निवडणूक लढविली. मात्र यात त्यांना अपयश आले. यातच २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इच्छा नसतांनाही पक्षाने त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. यामुळे इच्छा नसतांनाही निवडणूक लढवून ते पराभूत झाले. तर यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत देवकर यांच्या ऐवजी पक्षाने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धरणगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांना संधी दिली. यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन दोन वर्षे झाली तरी गुलाबराव देवकर यांचे पुनर्वसन होत नव्हते. मध्यंतरी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा येणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र तसे झाले नाही. यातच एकनाथराव खडसे यांच्या सारख्या मातब्बर नेत्याने आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळेही देवकरआप्पांचे पुनर्वसन लटकणार की काय ? अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी चालून आली. आणि याचमुळे त्यांच्याकडे आता बँकेच्या अध्यक्षपदासारखी मोठी जबाबदारी आली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय संपादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अध्यक्षपदाची जबाबदारी ही एकनाथराव खडसे यांच्याकडे सोपविली होती. यामुळे त्यांची कन्या रोहिणीताई यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर, स्वत: नाथाभाऊ यांच्याकडेही अध्यक्षपद येऊ शकते असे मानले जात होते. या सर्व गावगप्पा सुरू असतांनाही गुलाबराव देवकर हे संयम राखून होते. त्यांच्या समर्थकांना आप्पा अध्यक्ष बनणार असा विश्‍वास होता. आणि झालेही तसेच !

एकनाथराव खडसे यांच्या गटाशी गुलाबराव देवकर आणि त्यांच्या समर्थकांनी आधीच जुळवून घेतले आहे. यातच देवकरांचे पुनर्वसन करून श्रेष्ठींनी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नक्कीच लाभ होणार आहे. तर दुसरीकडे स्वत: गुलाबराव देवकर हे आगामी विधानसभेच्या तयारीला जोरोने लागू शकतात. अर्थात, ते जळगाव ग्रामीण ऐवजी शहरातून चाचपणी करत असल्याचे मध्यंतरी अधोरेखीत झाले होते. आता अध्यक्षपदानंतर त्यांच्या मिशन विधानसभा या मोहिमेला बळ मिळण्याची शक्यता आहे.

गुलाबराव देवकर यांना अलीकडच्या काळात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. त्यांना झालेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या कालावधीत त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका खारीज केल्याने त्यांना फार मोठा दिलासा मिळाला होता. याच्या पाठोपाठ आता जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाल्याने देवकरांना देव पावल्याचे स्पष्ट झाले आहे. ते तब्बल १९९१ पासून अव्याहतपणे जिल्हा बँकेत निवडून येत आहेत. त्यांनी दोनदा उपाध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली असली तरी अध्यक्षपदाने त्यांना हुलकावणी दिली होती. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हा बँकेत एंट्री केल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी का होईना त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्याची बाब लक्षणीय आहे. रोहिणीताई खडसे यांच्या प्रमाणेत देवकरांनी सुध्दा पारदर्शक आणि कार्यक्षम कारभार करून बँकेला पुढे न्यावे हीच आता अपेक्षा…!

Protected Content