जळगाव प्रतिनिधी | दोन दिवसांपूर्वी नशिराबाद येथे गोळीबार करून एकाची हत्या केल्यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता जळगावात गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी जामीनावर सुटलेल्या आरोपीला नशिराबाद येथील उड्डाणपुलाच्या खाली हल्ला करून ठार करण्यात आले असून त्याच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत गोळीबारसह चॉपरचा उपयोग करण्यात आला होता. याच्या पाठोपाठ आता जळगावात देखील गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील कांचननगर भागात सकाळी आठच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार आकाश सपकाळे या तरूणावर आज सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी थेट घरात शिरून गोळीबार केला. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. याला पूर्व वैमनस्याची किनार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याआधी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर पिंप्राळा परिसरात गोळीबार करण्यात आला होता. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नव्हते. मात्र जळगावातील गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच्या पाठोपाठ आता कांचन नगर परिसरात फायरींग झाल्यामुळे गुन्हेगार कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे.
( ही ब्रेकींग न्यूज असून आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत. आपल्याला सविस्तर माहिती लवकरच देत आहोत.)