जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भर दिवसा कार्यालयात ओली पार्टी केल्या प्रकरणी पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर शाखा अभियंता आर. आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात भर दिवसा कर्मचारी मद्य प्राशन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या चर्चेचा विषय बनला होता. याची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या नुसार आज चौकशी करण्यात आली असता मद्य प्राशन करणारी व्यक्ती ही शाखा अभियंता आर.आर. ठाकूर असल्याचे निष्पन्न झाले. तर त्यांच्या सोबत हरचंद खंडू हजबन हे अनुरेखक म्हणून काम करणारे असल्याचे दिसून आले.
या अनुषंगाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी करत मजिप्रा जळगाव कार्यालयाचे शाखा अभियंता आर.आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत. निलंबनाच्या काळात ठाकूर यांना मजिप्रा उपविभाग कार्यालय नंदुरबार येथे हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत. तर हजबन यांना एरंडोल येथे हजेरी लावण्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही जणांसोबत सेवानिवृत्त उपअभियंता टि.एस. गाजरे हे देखील ओल्या पार्टीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना सहा महिन्यांसाठी करारावर घेण्यात आले होते. या प्रकरणानंतर त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे. कार्यालयातच मद्य प्राशन करण्याच्या प्रकरणात थेट शाखा अभियंत्यालाच निलंबीत करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.