जळगाव प्रतिनिधी । जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, यासोबत गिरीश महाजन यांच्या गर्विष्ठपणामुळे येथील महापालिकेत सत्तांतर झाल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.
आज जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपचा फुटीर गट आणि एमआयएमच्या मदतीने महापौर आणि उपमहापौरपदांवर कब्जा मिळवल्याने राज्याच्या वर्तुळाचे लक्ष इकडे लागले आहे. अतिशय भक्कम बहुमत असतांनाही भाजपचा झालेला दारूण पराभव हा चर्चेचा विषय बनला आहे. यातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एबीपी-माझा या वाहिनीशी बोलतांना या प्रकरणी थेट गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
खडसे म्हणाले की, जळगावच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली होती. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. यामुळे नगरसेवक आधीच नाराज होते. त्यांना फोडण्यासाठी फार काही प्रयत्न करावे लागले नाहीत. तर हा पराजय गिरीश महाजन यांच्या गर्विष्ठपणाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. महाजन यांनी जळगावकरांना भूलथापा दिल्या. त्यांनी दोन-चार कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कामे करण्याचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. शहरातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. यातच ते नगरसेवकांशी अतिशय गर्विष्ठपणे बोलत असल्याचा भाजपला फटका बसल्याचे खडसे म्हणाले.