जळगाव प्रतिनिधी | उपसा सिंचन योजनेतील रस्त्यांचे काम चक्रधर कन्स्ट्रक्शनला मिळावे म्हणून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार कंत्राटदार अखील चौधरी यांनी केल्यानंतर अखेर आज ही निविदा रद्द करण्यात आली आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत आपल्या विभागाकडून वरणगाव तळवेल उपसा सिंचन प्रकल्पाच्या माळेगांव, हरताळा शिवार ता.मुक्ताईनगर, ओझरखेडा डॅम ता.भुसावळ जि. जळगाव येथे डब्ल्यु.बी.एम. रस्ते बांधकाम कामाची संदर्भीत नमूद निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामाचे अंदाजपत्रक रु.११ कोटी ५२ लाख रूपये एवढे असून कामाची मुदत ८ महिने आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत दिनांक २९ जुलै २०२१ ही होती. तर इच्छुक निविदा पारकांना आवश्यक डॉक्युमेंट, कामाच्या अभियंत्यांसह फोटो अपलोड करण्यासाठी शुक्रवार दिनांक २३ जुलै ही मुदत देण्यात आलेली होती. यासाठी कंत्राटदार अखील चौधरी यांनीदेखील निविदा भरली होती. तर फोटो अपलोड करण्यासाठी ते प्रत्यक्ष साईटवर गेले असता अभियंता राजपूत आणि चक्रधर कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या कंत्राटदारांच्या माणसांनी दबावतंत्राचा वापर केला. व यामुळे निविदा भरता आली नसल्याची तक्रार अखील चौधरी यांनी आज निवेदनाच्या माध्यमातून केली होती.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. तापी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्यांनी याची गांभिर्याने दखल घेत ही निविदा रद्द केली. अखील चौधरी यांनी सोशल मीडियात महामंडळाचे कार्यकारी अभियंता य. म. कडलग यांनी याबाबत जारी केलेले पत्र टाकले आहे. यात ही निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता निविदा रद्द झाली तरी दबाव टाकल्याच्या प्रकरणाचे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.