प्रामाणिकपणाचे दर्शन : रिक्षा चालकाने महिलेची पर्स केली परत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक येथून लग्नासाठी आलेल्या महिलेची जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरुन रिक्षा प्रवास करतांना १० हजारांची रोकड व २ मोबाईल असलेली पर्स रिक्षातच राहिली होती. ही पर्स सुप्रिम कॉलनी येथील रिक्षाचालकाने शनिपेठ पोलिसांच्या माध्यमातून महिलेला परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. या रिक्षाचालकाचा बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विमलबाई चंद्रकांत खैरनार रा.क्रांती नगर, नाशिक या सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या भाचीच्या लग्नासाठी भुसावळला आले होते. भुसावळ येथून लग्न आटोपून सायंकाळी ट्रॅव्हल्सने त्या जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे उतरल्या. त्यानंतर रिक्षातून प्रवास करत शनिपेठ परिसरातील बालाजी मंदिर येथे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेल्या. यादरम्यान रिक्षात प्रवास करत असतांना, त्या रिक्षात त्यांची २ मोबाईल व १० हजार रुपयांची रोकड असलेली पर्स रिक्षातच विसरल्या.

ज्या रिक्षात विमलबाई बसल्या होत्या, ती रिक्षा अब्दुल रशीद अब्दुल कादर रा. सुप्रीम कॉलनी यांची होती. अब्दुल काद यांनी यांनी रात्री नेहमीप्रमाणे रिक्षा घरी उभी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अब्दुल कादर हे रिक्षाची साफसफाई करत असतांना रिक्षात पर्स सापडली. पर्समध्ये दोन मोबाईल व रोकड होती. अजिंठा चौफुलीवरुन बालाजी मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलेची ही पर्स असावी, अशी शंका अब्दुल कादर यांना आली, त्यांनी तत्काळी पर्स ही शनिपेठ पोलिसाच्या स्वाधीन केली, पर्समधील मोबाईलच्या आधारावर शनिपेठ पोलिसांनी संबंधित महिलेची संपर्क साधला. बुधवारी, महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून तिला पर्स परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल शनिपेठ पोलिसांनी रिक्षाचालक अब्दुल कादर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमोल विसपुते, मनोज इन्द्रेकर, सुनील पवार, गिरीश पाटील, रविंद्र बोडवडे, मुकुंद गंगावणे हे उपस्थित होते.

Protected Content