


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील २५ आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अमळनेर तालुक्यातील प्रा. हिरालाल पाटील यांचाही आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कार आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देण्याचे कार्य ते सातत्याने करतात. अशा शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, वरिष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे, किसान काँग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश पवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, मगन पाटील, रोहिदास दाजी, रज्जाक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील प्रा. हिरालाल पाटील यांचा त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल यावेळी विशेष गौरव करण्यात आला. प्रा. पाटील हे वसंतनगर, ता. पारोळा येथील जुनिअर कॉलेजमध्ये गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहेत. दीर्घकाळापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य के. आर. पाटील, मुख्याध्यापक आर. सी. चौधरी, ज्येष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले. जिल्ह्यातील २५ आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.



