भाजपच्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

जळगाव प्रतिनिधी | घरकूल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या भाजपच्या चार नगरसेवकांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून आता या संदर्भातील दुसर्‍या खटल्याचे जळगावच्या कोर्टात कामकाज होणार आहे. यात आता नेमका काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात वृत्त असे की, भाजपचे गटनेते भगत बालाणी, माजी महापौर सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना घरकूल घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या नगरसेवकांविरुद्ध जळगाव न्यायालयात अपात्रतेचा दावा सुरू आहे. या दाव्यात महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करत पाचही नगरसेवकांना शिक्षा झाल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे असे म्हणणे मांडले आहे. त्यानंतर पाचही नगरसेवकांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या नोटीस विरोधात भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व कैलास सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळावी अशी विनंती केली होती. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या न्यायासनासमोर कामकाज झाले. त्यात न्यायालयाने भाजपच्या चारही विद्यमान नगरसेवकांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. नगरसेवकांच्या वतीने ऍड. सचिंद्र शेटे तर सरकारच्या वतीने ऍड. प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान, शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव न्यायालयात या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दावा दाखल केला आहे. त्यावर आज कामकाज होणार आहे.

Protected Content