भुसावळ, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित १९ व्या राज्यस्तरीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जळगावने नागपूरला २५ धावांनी पराभूत करीत विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात अमरावतीला दोन गड्यांनी नमवले आहे.
दोंडाईचा येथे हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज येथे आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्यातील ३० जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला असून जळगाव संघाने नागपूर संघाला २५ धावांची नमवले. प्रथम फलंदाजी करताना जळगावने ६२ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात नागपूरला फक्त ३७ धावाच करता आल्या. दुसऱ्या सामन्यात जळगावने अमरावतीला ५० धावांत रोखले निर्धारित लक्ष जळगावने एक ओवर व दोन गडी राखून गाठले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन हस्ती क्रीडा संकुल मैदानावर झाले. प्रसंगी उद्घाटक म्हणून दोंडाईचा नगर परिषदेचे नगरसेवक निखील राजपूत, महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष-डॉ. सलीम फारूखी, उपाध्यक्ष- बाबुलाल धोत्रे, सचिव- मोहम्मद बाबर, उत्तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष वासेफ पटेल ,नाशिकचे मुकुंद झनकर, धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष- दिनेश वोरा, हस्ती स्कूल स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष- डॉ. विजय नामजोशी व प्राचार्य हरिकृष्ण निगम, प्रतिक कुलकर्णी, तारेख पटेल, विनोद राठोड हे उपस्थित होते. उद्घाटनानंतर स्पर्धेत सहभागी सर्व क्रिकेट पटूंना हस्ती स्कूलतर्फे पुस्तकरूपी स्नेह भेट प्रदान करण्यात आली.