अरे व्वा : जळगाव जिल्हा आता कोविडच्या नियमांपासून मुक्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविडच्या आपत्तीमुळे सुमारे दोन वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात लावण्यात आलेले सर्व निर्बंध आता उठविण्यात आले असून याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परिपत्रक जारी केले आहे.

कोविडची आपत्ती सुरू झाल्यापासून अर्थात मार्च २०२०पासून महाराष्ट्रात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही निर्बंध लादण्यात आले होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे नियम वेळोवेळी बदलण्यात देखील आले होते.

दरम्यान, अलीकडच्या काळात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने कोविडच्या नियमांना शिथील करण्याची घोषणा केली आहे. यानुसार राज्यातील कोविडचे सर्व नियम मागे घेतले जातील असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नियम देखील शिथील करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी ४ मार्चनंतर निर्बंधांबाबत आदेश काढलेला नाही. या आदेशानुसार सामाजिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सभा, सण, उत्सव, लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांना जागेच्या ५० टक्के क्षमतेच्या आत किंवा २०० लोकांची मर्यादा होती.शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, बार, स्पोट्र्स कॉम्प्लेक्स, धार्मिक स्थळे, नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याचे आदेश होते. उपस्थितीसाठी लसीकरण बंधनकारक होते. या सर्व निर्बंधातून जिल्हा आजपासून मुक्त झाला. वेळोवेळी काढण्यात आलेले सर्व आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मागे घेतले आहेत आता सर्व सार्वजनिक कार्यक्रम आधीप्रमाणेच साजरे करता येतील.

दरम्यान, कोविडचे निर्बंध उठविण्यात आले असले तरीदेखील नागरिकांनी मास्क आणि फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुचविले आहे. अर्थात, याची सक्ती नसून हे नियम ऐच्छीक असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

Protected Content