जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या वारसांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच मोटार अपघात न्यायालयाने दिला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक १३/०६/२०१८ रोजी तव्हेरा वाहनातून ( वाहन क्रमांक चक १२ सीवाय ८१९१) प्रवास करीत असताना सदर वाहनाच्या वाहनचालकाने बेदरकारपणे गाडी चालवून त्यावरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हाडरला धडकली होती सदर अपघातात सखुबाई धनगर या भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता.
सदर वाहनाच्या वाहन चालक व वाहनाची इन्शुरन्स कम्पनी नॅशनल इन्शुरन्स कम्पनी विरुद्ध मयत सखुबाई धनगर यांच्या वारसदारांनी २० लाख रुपये भरपाईचा दावा दाखल केला होता. सदर दावा मा न्यायमूर्ती एस. आर. पवार यांच्या दालनात चालला.
सदर खटल्यात तव्हेरा गाडीचे मालक व वाहन चालक रविंद्र दिनकर चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केलेले नव्हते. तर नॅशनल इन्शुरन्स कम्पनीने सदर वाहन खाजगी वाहन असून ते व्यावसायिक कामासाठी वापरले जात होते तसेच वाहनचालकाकडे वैध परवाना नव्हता तसेच अपघात घडल्यावर तातडीने इन्शुरन्स कंपनीला कळविले नाही असे मुद्दे मांडले होते.
सदर केस बाबत न्यायालयाने वाहन चालक व नॅशनल इन्शुरन्स कम्पनी या दोघांना संयुक्तपणे एक लाख रुपये सोबत ७ टक्के व्याज वादीस देण्याचे तर निष्काळजी पणे वाहन चालवले म्हणून वाहन चालक याने ९,००२४० ( नऊ लाख दोनशे चाळीस) अधिक ७ टक्के व्याज इतकी रक्कम मृत महिलेच्या वारसांना याचिका दाखल तारखेपासून देण्याचे आदेश मोटार वाहन न्यायमंडळाचे सदस्य न्या. एस. आर. पवार यांनी दिले आहेत. व्याजासह ही रक्कम सुमारे दहा लाख रूपये इतकी असणार आहे.