ब्रेकींग : जिल्हा दुध संघ निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकची मतमोजणी सुरू झाली आहे. लवकरच येथे कुणाची सरशी होणार हे कळणार आहे.

जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यात शेतकरी पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश तर सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याने निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीच्या काळात अनेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानानंतर दोन्ही पॅनलनी विजयाचा दावा केला.

या पार्श्‍वभूमीवर, रविवारी सकाळी आठ वाजेपासून रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी सात टेबल असून 22 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन तासांत विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यात कुणाची सरशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content