जळगाव प्रतिनिधी । भाजपचे नगरसेवक हे आर्थिक आमिषाला बळी पडल्याचा आरोप करत आपण भारतीय जनता पक्ष आणि आ. गिरीश महाजन यांना सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे. सोनवणे हे शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपमधील एक ज्येष्ठ नगरसेवक शिवसेनेच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नगरसेवकाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली असून ते पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहू शकतात अशी चर्चाही रंगली आहे. यातील संबंधीत ज्येष्ठ पदाधिकारी हे कैलास सोनवणे असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर, सोनवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या संदर्भात कैलास सोनवणे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यात पालकमंत्र्यांशी आपली भेटही झालेली नाही आणि फोनवरही बोलणे झालेले नाही. काही लोकांनी रचलेले हे बदनामीचे षडयंत्र आहे. ज्येष्ठ नगरसेवकांची नावे सांगून इतरांना फोडण्याचा हा प्रयत्न असावा. आपण भाजप आणि गिरीश महाजन यांना सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. महापौर निवडीच्या वेळी बंडखोरी केलेल्या २७ नगरसेवकांत तत्कालिन उपमहापौरांसह सभापती पद भोगलेल्यांचा देखील समावेश होता. पक्षाने त्यांना मोठी पदे दिली, प्रभागांमध्ये विकास कामेही झाली. असे असतानाही पक्ष सोडणारे आर्थिक मोहाला बळी पडले आहेत, असेही सोनवणे म्हणाले.
दरम्यान, भाजपात राहिलात तर तुमच्या प्रभागात कामे होणार नाहीत, अशी धमकी नगरसेवकांना दिली जाते आहे. सत्तेच्या बळावर पैशांचेही आमिष दाखवले जाते आहे. मात्र, कोणतेही सत्ताधारी निधी खर्चाच्या बाबतीत अशा पक्षीय दुजाभाव करू शकत नाहीत असे कैलास सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.