नगररचनातील गैरकारभाराबाबत चौकशी समिती स्थापन करा : प्रशांत नाईक

जळगाव प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या नगररचना विभागाबाबत सातत्याने आवाज उठविणारे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी या विभागातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी झाल्यास अहवाल सादर करा, अन्यथा यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापालिकेतील नगररचना विभागावर गंभीर आरोप करत या संदर्भात जाहिरातीच्या माध्यमातून जळगावकरांना सतर्कतेचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. या माध्यमातून सत्ताधारी नगरसेवकानेच आपला पक्ष आणि प्रशासनाला घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे. प्रशांत नाईक यांनी नगररचना विभागात एजंट सक्रीय असल्याचा गंभीर आरोप करत बांधकाम परवानगीसाठी नागरीकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात नाईक यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदनाच्या माध्यमातून आव्हान दिले आहे.

यात नमूद केले आहे की, महापालिकेने नगररचनातील कारभारासंदर्भात खुलास करताना व्यवस्थित काम सुरू असल्याचा दावा केला आहे; परंतु हा दावा करताना आयुक्तांनी नगररचना विभागाची चौकशी केली होती का? केली असेल तर समितीत कोण होते? या समितीने दिलेला अहवाल जाहीर करावा अशी मागणी केली आहे. जर चौकशी न करताच आपली भूमिका मांडली असेल तर वस्तुस्थिती समोर येण्यासाठी मनपाने चौकशी समिती आठवडाभरात गठीत करावी. यात तज्ज्ञ वास्तुविशारद, बिल्डर, सामान्य नागरीकांचा समावेश करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, नगररचनातील कामकाजाविषयी आपण आतापर्यंत अनेक तक्रारी दाखल झाल्या. परंतु त्या तक्रारींचे पुढे काहीही होत नसल्याचे म्हटले आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती दिली जात नसल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आलेला आहे. यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पुन्हा एकदा नगररचनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Protected Content