जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ बॉंबमध्ये आज निर्णायक वळण आले असून जळगावच्याच तेजस मोरे याने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा ‘गेम’ लावल्याचा आरोप खुद्द त्यांनी केला आहे. तेजस मोरे समोर आला नसला तरी त्याचे राष्ट्रवादीचे कनेक्शन आणि प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये घड्याळातूनच करण्यात आलेले स्टींग ऑपरेशन या योगायोगाबाबत तुफान चर्वण सुरू झाले आहे.
राज्यातील राजकारणाला हादरा देणार्या पेन ड्राईव्ह प्रकरणातील व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावकर तेजस मोरे याचे थेट नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट करत आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हेच कसा प्रयत्न करत होते ? हे दर्शविण्यासाठी विधानसभाध्यक्षांना तब्बल सव्वाशे तासांचे व्हिडीओ फुटेज सोपविल्याने खळबळ उडाली आहे. यात गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी ऍडव्होकेट चव्हाण हे संबंधीतांना सूचना करत असल्याचे यातील काही व्हिडीओजच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणातील बहुतांश धागेदोरे हे जळगावशी जुळलेले असल्याचे तात्काळ अधोरेखीत झाले होते. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.
दरम्यान, प्रवीण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा जळगाव येथील तेजस मोरे हा तरूण त्यांच्याकडे जामीनच्या कामासाठी आला होता. त्याने चव्हाण यांना भिंतीवरील घड्याळ भेट दिले होते. याच घड्याळातील छुप्या कॅमेर्याच्या मदतीने आपले चित्रीकरण करण्यात आले. आणि याच व्हिडीओजमध्ये छेडछाड करून ते विधानसभेत सादर करण्यात आल्याची माहिती प्रवीण चव्हाण यांनी दिली. यामुळे आज दिवसभरात तेजस मोरे याचा शोध सुरू झाला. तो स्वत: अजून प्रसारमाध्यमांच्या समोर आला नसला तरी त्याच्या बाबतची बरीचशी माहिती समोर आली असून यातील काही बाबी या आश्चर्यकारक अशाच आहेत. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.
तेजस मोरे हा जळगाव येथील रहिवासी असून त्याचे वडील रवींद्र मोरे हे जिल्हा परिषदेत अभियंता होते. त्याचे जिल्हा परिषद कॉलनीत घर असून तेथे सध्या भाडेकरू राहत आहेत. मध्यंतरी त्याच्यावर खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यात तो तुरूंगातही गेला होता. तेथून बाहेर आल्यानंतर त्याचे जळगावातील संबंध कमी झाले. आणि आज अचानक त्याचे प्रवीण चव्हाण यांच्या स्टींग ऑपरेशनमध्ये नाव आल्याने त्याचे जळगावातील शेजारी चकीत झाले आहेत.
दरम्यान, तेजस मोरे हा राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष बाब म्हणजे त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरील एका फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो देखील असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, त्याचे राष्ट्रवादीसोबतचे उघड कनेक्शन असतांना त्याने घड्याळाच्याच माध्यमातून विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टींग ऑपरेशन केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. घड्याळाचा हा अनोखा योगायोग आता चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे हा आपल्याकडे जामीनाच्या कामासाठी आला होता. आणि त्याची फी देखील त्याने अद्याप दिलेली नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते सरकारी वकील असल्यामुळे एखाद्या गुन्हेगाराचा खटला लढण्यासाठी कसा घेऊ शकतात ? यामुळे तेजसकडे पैसे बाकी असल्याचा त्यांचा दावा देखील कमकुवत होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. अर्थात, या सर्व बाबींचा खुलासा तेजस मोरे हा मीडियासमोर आल्यानंतरच होऊ शकतो. मात्र, तोवर तेजस मोरे हा नेमका कोण आहे ? यापासून ते त्याचे राष्ट्रवादीचे कनेक्शन आणि घड्याळाचा योगायोग याबाबत एकच चर्चा रंगली आहे.