जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात पैसे घेतांनाची क्लिप गाजल्यामुळे चर्चेत आलेले सावदा ता. रावेर येथील मंडल अधिकारी बी.एम. पवार यांना निलंबीत करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, सावदा (ता. रावेर) येथील मंडल अधिकारी बी.एम. पवार यांच्या आधीपासूनच खूप तक्रारी होत्या. यात काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दोन क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. यातील एकात ते दहा हजार तर दुसर्यात चाळीस हजार स्वीकारत असल्याचे दिसून येत होता. अवैध वाळूची वाहतूक करणार्यांकडून पवार हे पैसे घेत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. हा व्हिडीओ रावेरसह सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे संबंधीत तक्रारदाराने याबात थेट महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे याबाबत तक्रार करून पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.
या गंभीर प्रकाराची महसूल प्रशासनाने लागलीच दखल घेतली. यात पहिल्यांदा संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून याचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी आज सावदा येथील मंडल अधिकारी बी.एम. पवार यांना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांना निलंबाच्या काळात पवार यांना जळगाव येथील तहसीलदारांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाता येणार नसल्याचे सुध्दा या आदेशात नमूद करण्यात आले आहे.