४० लाखांच्या वसुलीसाठी बिल्डरच्या किडनॅपींगची ‘सुपारी’ ! : पोलिसांनी उधळला डाव

जळगाव प्रतिनिधी | बायोडिझेलच्या व्रिकीसह खरेदीच्या व्यवहारापोटी व्याजासह दिलेल्या ४० लाख रूपयांची वसुली जळगावातील बिल्डरकडून करण्यासाठी त्याचे अपहरण करण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून रामानंदनगर पोलिसांनी अतिशय नाट्यमय घटनेत या व्यक्तीसह त्याच्या दोन सहकार्‍यांची सुटका केली आहे.

बायोडिझेलच्या व्रिकीसह खरेदीच्या व्यवहारापोटी दिलेले व्याजासह एकूण ४० लाख रुपये परत दिले नाही म्हणून मयूर वसंत सोनवणे उर्फ मयूर महाजन (वय ३५ रा. जिजाऊ नगर, जळगाव) या बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला धाक दाखवण्यासाठी सात आठ जणांना सुपारी दिली. यानुसार सुपारी घेतलेल्यांंनी पैशांसाठी मयूर महाजन यांच्यासह त्याच्या दोन्ही चालकांना नाशिक, संगमनेर, अजिंठा अशा वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत बंदुकीच्या गोळयांसह वेगवेगळ्या प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान बांधकाम व्यावसायिक मयूर महाजन यांनी पैसे मागविण्याच्या बहाण्याने मोबाईलवरुन पत्नीसह बहिणीला लोकेशन पाठविले. त्यानुसार प्रकरण पोलिसात पोहचल्यावर रामानंदनगर पोलिसांनी सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून बांधकाम व्यावसायिक महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांची सुटका करुन आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात मयूर वसंत महाजन यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार, जिजाऊ नगरातील मयूर सोनवणे उर्फ महाजन यांची नाशिक येथे संस्कार एंटरप्रायजेस नावाची फर्म आहे. चार महिन्यांपूर्वी महाजन हे बायोडिझेल होलसेल विक्रीचा व्यवसाय करत होते. यादरम्यान त्यांची मलिक नावाच्या व्यक्तीसोबत ओळखी झाली. ओळखीतून मलीक याच्यासोबत महाजन यांचा बायोडिझेलचा व्यवहार झाला होता. या व्यवहारापोटील मलिक याने महाजन यांना ८० लाख रुपये दिले होते. त्यापैकी ठरल्या व्यवहाराप्रमाणे महाजन यांनी मलिक याला ७८ लाख रुपये किंमतीचे चार टँकर बायोडिझेल पुरविले होते. दोन लाख रुपये बाकी असतांना, मलीक याने फोन करुन महाजन यांना १८ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले. तसेच व्याजासह ही रक्कम ४० लाख रुपये असून ती रक्कम परत करण्याचे महाजन यांना सांगितले.

दरम्यान, कोरोना असल्याने व्यवहार बंद असल्यामुळे मयूर महाजन यांना मलिक याची उर्वरीत रक्कम परत करता आली नाही. यातून मलिक याने महाजनांची सुपारी दिली. सुपारी घेतलेल्या सात ते आठ जणांनी महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना बहाणा करुन बोलावून घेत किडनॅप केले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली. सिल्लोड रोडने महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना घेवून जात असतांना महाजन यांनी संबंधितांना तुम्हाला देण्याासाठी पैसे मागवायचे आहेत. त्यासाठी मोबाईल मागितला. यादरम्यान महाजन यांनी त्यांची पत्नी शमीका हिच्याशी बोलणे करुन तिला मोबाईलवरुन लोकेशन पाठविले. तसेच महाजन यांनी त्यांची जळगावातील बहिण माधुरी चव्हाण हिला सुध्दा लोकेशन पाठविले. हा प्रकार महाजन यांनी संबंधितांना कळू दिला नाही. जळगावात लोकेशन तसेच महाजन यांच्यासोबत घडल्या प्रकाराबाबत महाजन यांची बहिणी माधुरी चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी मयूर महाजन यांच्या मोबाईल लोकेशनवरुन सिल्लोड रोडवरील साईमिलन हॉटेल गाठले. येथे डांबून ठेवलेल्या महाजन यांच्यासह त्यांचे चालक विजय सुभाष इंगळे व सागर जीवन विसपूते या तिघांची पोलिसांनी सुटका केली.

रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळावरुन पोलिसांनी अमजद दाऊद सैय्यद, शेख बिलाल गुलाम, मजाज दाऊद सैय्यद, अब्दुल नासिर गफ्फार, इम्रान इलियास शेख, अजीम अजीज शेख, शहानवाज वजीन खान, अबुकर सलीम मलीक या आठ जणांना ताब्यात घेतले. तर, दोन जण गाडीतून पसार झाले आहे. सुखरुप सुटका झाल्यानंतर मयूर महाजन यांनी घडल्याप्रकाराबाबत शनिवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!