जळगाव प्रतिनिधी | दवाखान्यात जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका प्रौढ व्यक्तीला त्याच्याच दोन्ही मुलांनी यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) हे निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. पत्नर, दोन मुले, दोन मुली यांच्यासह ते येथे वास्तव्याला होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज सकाळी त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी याला नकार दिला. यावर घरात वाद झाला.
या वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून आपल्या मुलांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत दोन्ही मुलांनी त्यांचा चाकूने वडिलांवर वार करून त्यांना संपविले. काही क्षणांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपक आणि गोपाळ या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल्यानंतर या धक्कादायक प्रकरणातील तपशील समोर आला आहे. या दोन्ही जणांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, रा. निमखेडीरोड, मूळ रा. घनश्यामपर, ता. खकनार, जि. बर्हाणपूर) हा पत्नी बसंतीबाई व दीपक, गोपाळ, कविता, शिवाणी ही चार मुले गेल्या दोन वर्षांपासून निमखेडी रस्त्यावरील लता राजेंद्र लुंकड यांच्या घरी भाड्याने राहतात.
गेल्या काही दिवसांपासून प्रेमसिंग हे नेहमी पत्नी बसंतीबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेत असत. त्यांच्या कानाची शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे रविवारी सकाळी दीपक व गोपाळ या दोन्ही मुलांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन जाणार होते. यावेळी प्रेमसिंग यांनी पत्नी बसंतीबाई हिलादेखील सोबत घेण्यास सांगितले. यावरून पुन्हा एकदा पती-पत्नीत वाद झाले. प्रेमसिंग यांनी पत्नीवर संशय घेतल्यामुळे मुलांना राग आला. प्रेमसिंग यांनी पत्नी व मोठा मुलगा दीपक यांंना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यामुळे पिता-पुत्रात झटापट सुरू झाली. प्रेमसिंग यांनी घरातून चाकू आणून गोपाळवर वार करण्याचा प्रयत्न केला. गोपाळने चाकू हिसकावून वडिलांच्या पोट, छाती व पायावर चाकूने सपासप वार केले. प्रेमसिंग रस्त्यावर पळत आल्यानंतर दीपक व गोपाळ या दोघांनी त्यांच्यावर रस्त्यावरही सपासप वार केले. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
भररस्त्यावर ही घटना घडत असताना तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी श्याम बोरसे हे दुचाकीने याच रस्त्याने ड्यूटीवर जात होते. बोरसे यांनी तत्काळ दीपक व गोपाळ या दोघांना पकडून ठेवत पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या हातात बेड्या घातल्या. पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक घटनास्थळी आले. त्यांनी गोपाळ व दीपक या दोघांना ताब्यात घेतले तर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मृत प्रेमसिंग यांचे भाऊ रोहिदास अभयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गोपाळ व दीपक विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कुंभार तपास करीत आहेत.