विद्यापीठात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिम व जनजागृती अभियान कार्यशाळेचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । प. क. कोटेचा महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे उद्घाटन व जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर होते.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वरील विचार मांडले. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजनेने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. शासनाने निर्देशित केलेले नियम वेळोवेळी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम जसे केले तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महत्त्वपूर्ण संकल्पना ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय सेवा योजना प्रबोधनातून व सर्वेक्षणातून समाजापर्यंत पोहोचवीत आहे .या कार्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कामही उल्लेखनीय आहे. असे विचार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विद्यापीठस्तरीय “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मांडलेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ पातळीवरील माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे समन्वयक डॉ. अनिल बारी यांनी प्रास्ताविक केले. तर शासनाच्या वतीने राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचे महत्त्व विशद करून जी त्रिसूत्री शासनाने सांगितले आहे ती राष्ट्रीय सेवा योजना घराघरापर्यंत पोहोचत असल्याचे नमूद केले. सोबतच आजवर राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्रात सगळ्यात विद्यापीठांनी उल्लेखनीय काम केल्याचे नमूद करताना नंदुरबार सारख्या जिल्ह्यात तंत्रज्ञानाची अडचण असतांनाही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विविध योजना यशस्वी राबविण्याचे नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक आणि या मोहीमचे प्रमुख समन्वयक डॉ.पंकज कुमार नन्नवरे यांनी ही मोहीम सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ही मोहीम कशी राबविली, सर्व स्तरातील कुटुंबापर्यंत कशी पोहोचली याविषयी आकडेवारीसह आढावा मांडून यापुढेही हे अभियान कशा पद्धतीने राबवायचे आहे यासंदर्भात भूमिका कथन केली. प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे विभाग क्षेत्रीय युवा अधिकारी अजय शिंदे यांनी आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय सेवा योजनेचे जे जे उपक्रम राबविले त्यांची दखल घेऊन दिल्ली येथील पीएम कार्यालयात कशी दखल घेतली गेली याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते कोवीड केअर सेंटर औरंगाबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ सोडाणी यांनी आपल्या तासाभराच्या मांडणीत अतिशय ओघवत्या शैलीत साध्या सरळ भाषेत कोरोना ची भीती, समज-गैरसमज, दक्षता त्यावरील उपाय, मानसिक भीती व्यक्त करत कुटुंब व समाजाने गाफील न राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळेला विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी. पाटील, पुणे गोवा विभागीय संचालक कार्तिकेयन ,सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा, संस्थेचे सचिव संजय सुराणा यांनी हे शुभेच्छा संदेश दिलेत .कार्यशाळेचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ.माधव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यशाळेच्या समन्‍वयक व कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी राठी यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय या मोहिमेचे समन्वयक डॉ. प्रशांत कसबे यांनी केला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा , विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. मीना चौधरी यांच्यासह उपप्राचार्य, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, धुळे, जळगाव जिल्हा समन्वयक व सर्व विभागीय समन्वयक ,कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content