डॉ. अशोक कोळी यांचे पुस्तक विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम लेखक डॉ. अशोक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या पुस्तकाची एम.ए. मराठी या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

जामनेरचे डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललित ग्रंथाची अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने वाङ्मय पारंगत एम.ए. मराठी अभ्यासक्रमासाठी निवड केली. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पुस्तक अभ्यासक्रमात असेल. या पुस्तकातून आपले बालपण व बालपणीचे कष्टमय जीवन शब्दबद्ध केलेले आहे. पुणे येथील नामांकित साधना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

डॉ. अशोक कोळी हे मूळचे जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवासी असून ते सध्या जामनेर येथे वास्तव्यास आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करणार्‍या अशोक कोळी यांना शैक्षणिक आणि साहित्य सेवेसाठी आधी अनेकदा गौरविण्यात आले आहे. इयत्ता चौथीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘धूळपेरणी’ या कवितेचा सामावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कथेची निवड झालेली आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट केले असून हा त्यांच्या साहित्य सेवेचा मोठा सन्मान समजला जात आहे.

Protected Content