ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर स्पष्टच बोलले : गुलाबभाऊंसोबतचा वाद म्हणजे. . .!

धरणगाव-अविनाश बाविस्कर (Exclusive Feature) | भारतीय जनता पक्षाने कालच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर Jalgaon BJP President Dnyaneshwar Patil Jalkekar Maharaj यांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी आज धरणगावला भेट दिली. याप्रसंगी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने विचारलेल्या प्रश्‍नांचा उत्तरे देतांना त्यांनी आगामी वाटचालीचे सूतोवाच देखील केले.

( Image Credit Source : Live Trends News )

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विविध जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर, रावेरसाठी अमोल हरीभाऊ जावळे तर जळगाव महानगराध्यक्षपदासाठी उज्वला बेंडाळे यांची उमेदवारी जाहीर केली. हे तिन्ही उमेदवार तरूण असून उज्वला बेंडाळे यांचा अपवाद वगळता दोघांना तर कोणत्याही लोकप्रतिनिधीपदांचा अनुभव देखील नाही. यात ज्ञानेश्‍वर महाराज पाटील जळकेकर यांचे नाव अनपेक्षित मानले जात आहे. अतिशय प्रखर बुध्दीमान वक्ते म्हणून ख्यात असणारे ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज हे भाजपला जळगाव लोकसभा मतदारसंघात अतिशय आक्रमक चेहरा प्रदान करतील अशी शक्यता आहे.

हे देखील वाचा : जळकेकर महाराज रॉक्स : ‘फायरब्रँड’ कार्यकर्ता ते भाजपचा कॅप्टन

काल भाजप जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर आज ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे धरणगाव येथे दाखल झाले असता त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केल्यानंतर पक्षाच्या स्थानिक कार्यालयात त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित निकम, भाजपचे नेते संजय महाजन, जिजाबराव पाटील, कैलास माळी, शिरीष बयस, चंदन पाटील, दिलीप महाजन, ललीत येवले, शेखर पाटील, सचिन पाटील, सुनील चौधरी, जुलाल भाई, आनंद बाचपये, गोपाल पाटील, कमलेश तिवारी, निर्दोष पवार, दीपक माळी, पुणीलाल महाजन आदींसह इतरांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : आमचे काय चुकले, म्हणून आम्हाला दूर केले ? : जळकेकर महाराज

याप्रसंगी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर यांना बोलते केले. अल्प काळात भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले की, मी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षात आलो. पक्षाचे काम केले, याचे फळ मला मिळाले. तथापि, एक कार्यकर्ता म्हणूनच आपण काम करणार असल्याचे प्रतिपादन जळकेकर महाराज यांनी केले.

दरम्यान, ज्ञानेश्‍वर पाटील महाराज यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय घणाघाती टिका करून एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देखील त्यांनी मंत्र्यांवर सातत्याने टिकास्त्र सोडले होते. यामुळे आता भाजपचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात प्रचार करणार का ? असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, राज्यात भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यानंतर आपण मंत्री महोदयांच्या विरोधात एक शब्द देखील बोललो नाही.

हे देखील वाचा : भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर, तरूण चेहर्‍यांना संधी

आगामी काळात भाजप आणि शिंदे गट स्वतंत्र लढल्यास पालकमंत्र्यांच्या विरूध्द प्रचार करणार का ? असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय हा पक्ष घेणार आहे. गुलाबभाऊ यांच्यासोबतचा वाद हा तात्वीक होता. आता मात्र आपण पक्षाने दिलेला आदेश पार पाडत कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांनी केले. यामुळे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सलोख्याच्या आणि सामोपचाराच्या मार्गावरून आगेकूच करण्याचे तूर्तास तरी संकेत दिल्याचे दिसून येत आहे.

खालील व्हिडीओत पहा ज्ञानेश्‍वर पाटील जळकेकर महाराज नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/842985287453736

Protected Content