बीएचआर घोटाळ्यात अटकसत्र सुरूच; मुख्यालयाचे मूळ मालकही ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे सात जणांना अटक केल्यानंतरची कारवाई सुरूच असून पुन्हा चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात ख्यातनाम कोगटा डाळ उद्योगाचे सर्वेसर्वा प्रेम कोगटा यांचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे कोगटा समूहाच्या आवारातच बीएचआयचे नवीन मुख्यालय आहे. यामुळे या अटकेला विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

यानंतर ठिकठिकाणी अटकसत्र सुरू करण्यात आले आहे. यात जळगाव येतील कोगटा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनाही अटक करण्यात आली आहे. ते डाळ उद्योगातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात आहेत. एक योगायोग असा की, बीएचआर सहकारी पतसंस्थेचे नवीन कार्यालय हे कोगटा उद्योग समूहाच्या आवारातच आहे. त्यांच्या फॅक्ट्रीतील मागच्या विस्तीर्ण जागेत बीएचआरचे अद्ययावत कार्यालय उभारण्यात आले आहे. ही जागा पतसंस्थेने खरेदी केली होती. अर्थात, येथे कार्यालय स्थानांतरीत झाल्यानंतर काही कालावधीतच पतसंस्थेतील घोटाळा समोर आला.

दरम्यान, प्रेम कोगटा यांना अटक केल्याचा संबंध जागेच्या व्यवहाराशी आहे का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, अंबादास बाबाजी मानकापे, प्रितेश चंपालाल जैन आणि जयश्री अंतिम तोतला यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तर अजून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

Protected Content