भागवत भंगाळे यांच्या निवासस्थानी झाडाझडती

जळगाव, प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे ताब्यात घेण्यात आलेले ख्यातनाम व्यावसायिक भागवत भंगाळे यांची जिल्हापेठ पोलीस स्थानकात चौकशी झाल्यानंतर त्यांच्या घरी झाडाझडती सुरू झाली आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

यात व्यावसायिक भागवत भंगाळे यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भंगाळे यांच्या अटकेची माहिती मिळतात आमदार राजूमामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सुनील भंगाळे आदींनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात धाव घेतली. सुमारे तीन तास चौकशी झाल्यानंतर भागवत भंगाळे यांना त्यांच्या घरी नेण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी आता झाडाझडती सुरू झाली आहे. यामुळे बीएचआर प्रकरणाशी संबंधीत पुरावे त्यांच्या घरून शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content