रेशनच्या धान्याची काळाबाजारात विक्री : दोन जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड ते आडगाव रस्त्यालगत असलेल्या एका गोडावर पुरवठा विभागाने छापा टाकून बेकायदेशीरित्या शासनाचा रेशनधान्य तांदूळ हा काळाबाजारात विक्रीसाठी आणलेला तांदूळ जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांच्याकडून ट्रकसह एकूण १६ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड ते आडगाव रोड लगत निलेश उर्फ पप्पू सुरेश वाणी यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीर रित्या शासनाचा तांदूळाचा साठा करून त्याचा काळाबाजारात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव पुरवठा विभागाला मिळाली. पुरवठा निरीक्षक अधिकारी चाळीसगाव राजेंद्र ढोले यांच्या पथकाने पोलीसांच्या मदतीने १६ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये पुरवठा विभागाने एकूण १६ लाख २९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ट्रक व तांदूळ जप्त केला आहे. या संदर्भात चाळीसगाव तालुक्याचे पुरवठा निरीक्षक राजेंद्र रामदास ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश उर्फ पप्पू सुरेश वाणी आणि ट्रकचालक रफिक शहा गप्पर शहा दोन्ही रा. उंबरखेड ता. चाळीसगाव या दोघांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.

Protected Content