जळगाव प्रतिनिधी | बहुचर्चीत बीएचआर घोटाळ्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेतर्फे जळगावातील साक्षीदार आणि ठेविदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
बीएचआर घोटाळ्याच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भोसले यांच्यासह पथकाने सोमवारी जळगावात ४० पेक्षा जास्त साक्षीदार, ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
बीएचआर घोटाळाप्रकरणी पुण्यातील डेक्कन, शिक्रापूर व आळंदी अशा तीन पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. यातील डेक्कन पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातच आत्तापर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू आहे. यातील प्रमुख सूत्रधार सुनील झंवर याला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात असून, त्याच्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचे युक्तिवादही पूर्ण झाले आहेत. झंवरच्या विरोधातील दोषारोपपत्र तयार करण्याचे काम पोलिस करीत आहेत. झंवर याने साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना अत्यंत काळजीपूर्वक साक्षीदारांची निवड व जबाब घ्यावे लागत आहेत.
पोलिस निरीक्षक भोसले यांनी सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील काही साक्षीदार, ठेवीदारांना बोलावून ठेवले होते. ज्यांच्या रहिवासाचे पत्ते होते त्यांना आधीच पत्राद्वारे कळवण्यात आले. यापूर्वी जप्त केलेल्या कागदपत्र, फायलींमधील सर्व डाटा पोलिसांकडे उपलब्ध आहे. त्या आधारावर साक्षीदारांना काही प्रश्न करून माहिती कन्फर्म करून घेतली जाते आहे. या शिवाय काही ठेवीदारांनी नवीन माहितीदेखील पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्याचे दोषारोप तयार करण्यासाठी साक्ष महत्त्वाच्या ठरणार आहेत.