जळगाव प्रतिनिधी | जामनेरहून जळगाव येथे येणार्या बसवर दगडफेक करणार्या एसटीच्या कर्मचार्याला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली असून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच प्रमाणे भिवंडी बसवर दगडफेक करणार्यालाही अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार काही कर्मचार्यांनी आपल्या बसेस मार्गस्थ केल्या होत्या परंतु दगडफेकीमुळे परत एकदा कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच घटना जळगाव जिल्ह्यात सुद्धा घडल्याने संपाला हिंसक वळण लागले की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जळगाव आगाराची पहिली बस क्र.एमएच २० बीएल ३४५१ जामनेर येथे रवाना झालेली होती. जामनेर येथून दुपारी २ वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात एका आयशर ट्रक क्रमांक एमएच ०४ इवाय ७१२५ मागे उमेश आवटी नावाचा जामनेर आगाराचा वाहक लपून बसला होता. बस समोर येतात त्याने दगड बसच्या काचेवर भिरकावला.
एसटी बस चालक सोपान सपकाळे चालक क्रमांक १३ ५८ यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने पुढील मुख्य काच थोडक्यात बचावला याप्रसंगी बस मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली याच बस मध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिस व वाहक गोपाळ पाटील यांनी बस मधून उडी घेऊन संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो एका शेतात मिळून आला. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. या प्रसंगी पोलीस ठाण्यात जामनेर आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील उपस्थित होते. या संदर्भात चालक सोपान सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश रमेश आवटी ( रा. वाकडी, ता. जामनेर) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
दरम्यान, एसटी कर्मचार्यांकडून दगडफेक झाल्याचे विविध प्रकार उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्रभर सुरू असलेल्या संपावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत कल्याण भिवंडी बस वर कोनगाव परिसरात दगडफेक केल्याप्रकरणी एका एसटी चालकास ताब्यात घेण्यात आल्याने परत एकदा खळबळ उडालेली आहे.