मुक्ताईनगरात श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाची सांगता

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी | सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात सतपंथ संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाची सांगता सर्व धर्माच्या पंथाच्या संतांच्या उपस्थितीत करण्यात आली.

तथापि, भारताच्या अखंडतेसाठी व सनातन हिंदू धर्माच्या ऐक्यासाठी गौरवास्पद कार्य असल्याने जनार्दन हरीजी महाराज म्हणजे सर्व धर्म पंथ समन्वय आचार्य असल्याचे भागवत कथाकार आचार्य अमृत आश्रम स्वामी महाराज यांनी सांगितले.

या कार्यक्रमात प्रचंड संख्येने उपस्थित भाविक भक्तांना आशीर्वचन देताना त्यांनी सांगितले की, भाषा, भेद, प्रांत, गोत्र, लिंग, पंथ संप्रदाय आणि पक्ष बाजूला ठेवून भारताच्या एक्यासाठी पुन्हा रामराज्य होण्यासाठी आणि महाराष्ट्रात शिवराज्य होण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे काळाची गरज आहे आणि ते कार्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज करीत असल्याचा सार्थ अभिमान आहे. सन २०१० मध्ये त्यांनी फैजपूर येथे भरविलेल्या ऐतिहासिक संत संमेलनाची आठवण करून दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताई संस्थानचे हभप श्री रविंद्र महाराज हरणे होते.

सतपंथ परिवारातर्फे आयोजक महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताई च्या दरबारात मला ही सेवा करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य आहे. हाच माझा सत्कार आणि माझी योग्यता आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करून मीच माझ्या खात्यातील बॅलन्स वाढविला आहे आणि तो बॅलन्स ‘जीवन के साथ भी और जीवन के बाद भी’ असा आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात संबंधी त्यांनी सांगितले की, नद्या अनेक असतात मात्र त्यांचे ध्येय एकच असते समुद्राला जाऊन एकरूप व्हावे. तसेच हिंदू संस्कृती व भारताच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे हेच या संत संमेलनाचे ध्येय आहे.

या संत संमेलनासाठी व्यासपीठावर संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज, आचार्य मानेकर बाबा शास्त्री, महंत श्रीकृष्ण गिरीजी महाराज, महंत भरतदासजी महाराज, शास्त्री भक्ती स्वरूप दासजी, संत स्वरूपानंद जी महाराज, संत मधुरानंद महाराज, डॉ. सचिन जी पाटील, हभप रविंद्र हरणे बाबा महाराज, संत श्याम चैतन्यजी, संत ब्रज चैतन्यजी, संत हरीश चैतन्य जी, संत पांडुरंग दासजी महाराज, दीपक भगतजी, हभप उद्धव महाराज, नितीन महाराज, विशाल महाराज, कन्हैया महाराज, गजानन वरसाडेकर महाराज असे वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे संत उपस्थित होते.

आदिशक्ती मुक्ताईचे आमंत्रण स्वीकारून भागवत कथा व नामसंकिर्तन सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल सनातन हिंदू धर्म संस्कृतीतील विविध, अनेक पंथ, उपासना पद्धती यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी भेदाभेद विसरून सर्व संतांना एकत्र करण्याचे दिव्य तसेच प्रशंसनीय कार्य करत असल्याबद्दल महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांना श्री मुक्ताई संस्थान कडून हभप रविंद्र महाराज हरणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी एकनाथराव खडसे यांनी उपस्थित सर्व संतांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. यावेळी डॉक्टर राजेंद्र फडके श्री अशोक कांडेलकर विनोद सोनवणे नरेंद्र नारखेडे यांच्यासह परिसरातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या संत संमेलनाआधी प्रसिद्ध कीर्तनकार हभप रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले. गेल्या सप्ताहापासून या धर्ममंडपात हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती दिली.

याबद्दल आयोजक महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमानंतर धानोरा व परिसरातील भाविकानी मांडे भोजनाची व्यवस्था केली होती. ही संत मुक्ताई यांच्या आवडीच्या मांडे (पुरणपोळी), खीर या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.

 

 

 

 

Protected Content