जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या विमानतळावर आधीच वैमानिक प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली असून याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे हे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. विमानतळावर झालेल्या बैठकीत याची माहिती देण्यात आली.
जळगाव विमानतळ विकास सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळावर झाली. या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, सल्लागार समितीचे सदस्य प्रेम कोगटा, भालचंद्र पाटील, सतीश देशमुख, डॉ. मंगेश वाडेकर यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे स्थानिक संचालक सुनिल मग्गरीवार यांची उपस्थिती होती.
देशात नव्याने मंजूर झालेल्या सहा वैमानिक प्रशिक्षण केंद्रात जळगावचा समावेश आहे. त्याच्या इमारतीच्या कामाच्या तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबतच माहिती यावेळी देण्यात आली. त्याला लवकरच मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
जळगाव-अजिठा दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याबाबत विमान प्राधिकरणाचे स्थानिक संचालक मग्गरीवार यांनी प्रेझेंटेशन सादर केले. खरं तर, तत्कालिन नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी २०१८ मध्ये औरंगाबाद येथे एमआयडीसी, एमटीडीसीचे अधिकारी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यावर पुढे काहीही झालेले नाही. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी प्राधिकरणाचे मग्गरीवार यांनी पत्र देण्यास सांगितले. लवकरच पुन्हा संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, जळगाव-पुणे विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करुन घेण्याबाबत विमानतळ प्राधिकरणातर्फे पत्र दिले आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला विमान प्राधिकरणाचे हेमा चंद्र, धीरेंद्र प्रसाद, मनिष कुमार, अभिषेक चतुर्वेदी, रकीब खान आदी अधिकार्यांची उपस्थिती होती.