जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्वप्नातून साकारलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने यंदाही इयत्ता १० वी च्या परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवून आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे, शाळेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत मोहित गजानन पाटील आणि प्रेम विनोद पावसे यांनी प्रत्येकी ९२.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. जान्हवी प्रदीप सोनवणे आणि रिया एकनाथ नेमाडे (प्रत्येकी ९१.६०%) यांनी द्वितीय, तर मिताली सुकलाल नाथ आणि घोषिता जयंत पाटील (प्रत्येकी ९१.००%) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. भावेश विकास गरुड (९०.८०%) आणि धिरज विकास पाटील (९०.६०%) यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक प्राप्त केला. शाळेतील १६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. उर्वरित विद्यार्थीही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या शानदार यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, तसेच अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.