अडावदच्या महाजन विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.४७ टक्के


अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित शामराव येसो महाजन विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेत यंदा ९३.४७ टक्के यश संपादन केले आहे. शाळेच्या या उत्कृष्ट निकालामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या परीक्षेत शीतल अशोक माळी हिने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. लितिक्षा दत्तात्रय चव्हाण ९१.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर भारती अनिल पवार ८६.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिली. यामिनी विजय महाजन (८४.६० टक्के) हिने चौथा, भावेश सुरेश महाजन (८३.६० टक्के) याने पाचवा आणि पल्लवी देविदास महाजन (८३.२० टक्के) हिने सहावा क्रमांक मिळवला.

शाळेतून एकूण ४६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २६ आहे, तर ८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी आणि ५ विद्यार्थ्यांनी पास क्लासमध्ये यश मिळवले आहे.

या शानदार यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब भगवान महाजन, उपाध्यक्ष तात्यासाहेब वासुदेव महाजन, सचिव आप्पासाहेब रमेश पवार, सहसचिव नानासाहेब आर. डी. माळी आणि सर्व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.