दुबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. आज २७ ऑगस्ट रोजी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इतर कोणी अर्ज न केल्याने जय शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. विशेष बाब म्हणजे १६ पैकी १५ सदस्यांचा शाह यांना पाठिंबा होता. पण, शाह यांची बिनविरोध निवड झाल्याने आयसीसीला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला आहे.
जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुस-यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. जय शाह हे १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत.