द्रविडने बीसीसीआयच्या नीती अधिकाऱ्यांपुढे मांडली बाजू

Rahul Dravid

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने बीसीसीआयचे आचारसंहिता अधिकारी डीके जैन यांच्यासमोर उपस्थित राहिला असून हितसंबंधांच्या मुद्द्यावरून त्याने जैन यांच्यासमोर आपली बाजू मांडली. यावेळी बीसीसीआय प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी द्रविडला या प्रकरणात पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद राय यांनी जैन यांना पत्र लिहून दोन उदाहरणे देत द्रविडने हितसंबंधांचा फायदा उठविलेला नाही, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राय यांनी या पत्रात म्हटले आहे की, द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी इंडिया सीमेंट्सकडे बिनपगारी सुट्टीचा अर्ज सादर केलेला आहे. त्यामुळे तिथे हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होत नाही. शिकागो विद्यापीठाकडे असा सुट्टीचा अर्ज रघुराम राजन यांनी सादर केला होता आणि त्यानंतरच ते भारतात गव्हर्नर म्हणून रुजू झाले होते. राजन हे शिकागो विद्यापीठात प्राध्यापक होते. राय यांनी नीती आयोगाचे माजी कार्याध्यक्ष अरविंद पानगरिया यांचेही उदाहरण नमूद केले आहे. त्यात ते म्हणतात की, नीती आयोगात काम करत असताना त्यांनी कोलंबिया विद्यापीठात सुट्टीचा अर्ज सादर केला होता. त्या कालावधीत ते विद्यापीठाकडून कोणतेही मानधन स्वीकारत नव्हते. त्यामुळे जर द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करत असताना इंडिया सीमेंट या आपल्या कंपनीकडून कोणतेही मानधन स्वीकारत नसेल तर तिथे हितसंबंधांचा मुद्दाच कुठे येतो ? रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणे द्रविडचेही हितसंबंध नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न राय यांनी केला आहे.

Protected Content