शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागांवर यश मिळाले. ज्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाविकास आघाडीने १८० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर महायुतीनेही जोमाने तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिर्डीत एक भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हते असं म्हटले आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो. तुमच्यासमोर येण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घेतले. आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या, असं साकडे साईबाबांकडे घातले. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाही. मी माजी मुख्यमंत्री आहे. माझा पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलंय आणि वडील पण चोरलेत, तरी तुम्ही माझ्याकडे मागताय. त्यानंतर मला दिवार सिनेमाचा डायलॉग आठवला? मेरे पास ईमान है, विश्वास है. तुम्हाला कल्पना आहे की माझ्या हातात काहीही नाही. तरीही तुम्ही मला बोलवत आहात. मी देखील आलो आहे. कारण मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे,
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने पेन्शन योजनाची मान्य केली तर तुम्ही काय करणार? निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत. तुम्ही जर आमचं सरकार आणलात तर मी तुमची मागणी मान्य करतो. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, जर हे स्वत:च्या शिवसेना या आईवर वार करु शकतात, हे तुमच्यावर वार करणार नाहीत. त्यामुळे मला हे सरकार नको आहे. माझे मुख्यमंत्री व्हायचंय स्वप्न तेव्हाही नव्हते, आताही पडत नाही. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात, तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.